Ad will apear here
Next
स्वामी - गोव्यातील ऐतिहासिक रंगभूमीने घेतलेला एक ताजा श्वास


शनिवारवाडा!

इतिहासाचे स्मरणमणी जपत, गतवैभवाच्या आठवणी जागवत वर्तमानकाळ त्रयस्थपणे अनुभवणारी जुनी जाणती वास्तू! 

या वास्तुपुरुषाच्या पोटात किती रहस्ये दडून बसली आहेत. 

तलवारबाजीचे खणखणाट अजून गुंजत राहतात, अन् रोमांच उठून राहिलेत खजिना विहिरीच्या पाण्यावर!

दगाबाजी अन् शेरेबाजी यांचे शह प्रतिशह गुंतून पडलेत इथल्या सारिपाटाच्या मखमली पटांत! 

अन् दोघे पेशवे बाजीराव... परस्परांच्या विरुद्ध व्यक्तिमत्त्व लाभलेले! 

शनिवारवाडा साक्ष आहे राजकारण, हेवेदावे अन् विश्वासाची! महत्त्वाकांक्षी सत्ता मंथनाची! एका महान साम्राज्याला लागलेल्या अंतर्गत गृहकलहाच्या ग्रहणाची! एका साध्वीने उराशी घट्ट कवटाळून धरलेल्या मंगळसूत्राची! कोवळ्या वयात धारातीर्थी पडलेल्या स्वप्नांची अन् कुण्या दुसऱ्याच्या ईर्ष्या आणि लालसेपोटी बळी गेलेल्या कोवळ्या जीवाचीदेखील! 

... पण त्याच शनिवारवाड्याच्या कोपऱ्यात दोन जिवांमध्ये उमललेल्या एका अबोध नात्याची गुलाबासारखी टवटवीत ताजी आठवणही त्याने अजून जपून ठेवली आहे! पानिपतच्या प्रलयाची अजूनही ताजी जखम हृदयाशी भळभळत असताना गृहकलहाचे चटके सोसत क्षयरोगाशी लढा देणाऱ्या माधवरावांच्या तेजस्वी वेदनेवर हळुवार फुंकर बनून जगलेल्या रमाबाईंची! सुकुमार, तरीही अबोल, अपुरी!! 



अग्निनारायणाच्या साक्षीने सुरू झालेली, अग्नीपरीक्षा देता देता अग्नीच्या उदरात लुप्त झालेली एक तेजस्वी प्रीतकहाणी! 

स्वामी! 

चौरंग, नागेशी या संस्थेने सादर केलेली, कला अकादमीच्या अखिल गोवा अ गट मराठी नाट्यस्पर्धेत शुभारंभाचा मान मिळालेली ही रणजित देसाई यांच्या लेखणीतून साकार झालेली ऐतिहासिक नाट्यकृती! हे नाटक माधवराव पेशव्यांच्या उण्यापुऱ्या सव्वीस-सत्तावीस वर्षांच्या आयुष्याचा धांडोळा घेते. त्यांच्या आजूबाजूच्या घटनांचे पडसाद नोंदवत असताना, त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्याबरोबर बहरलेल्या परिपक्व नात्याची गुंफण समोर ठेवते. शशिकांत नागेशकर यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक रंगभूमीवर आपली वेगळी छाप पाडून जाते. 



अभिनय, भाषा, रंगभूषा याबाबत हे नाटक उत्कृष्ट ठरले आहे. गौतम दामले यांनी साकारलेले, घरातील कारस्थानामुळे दिग्मूढ झालेले अन् आजारामुळे विकल झालेले, तरीही राजस्वी तेजतर्रार असे श्रीमंत माधवराव पेशवे अत्यंत उजवे. त्यांची देहबोली, अन् संवादफेक भूमिकेला योग्य न्याय देते. श्वेता महाजन यांनी साकारलेली रमा संयत, तरीही आत्मभिमानी अशी आहे. विजयेंद्र कवळेकर यांनी दोलायमान अवस्थेत असलेले तरीही भोळसट स्वभावाचे रघुनाथराव पेशवे उत्तम उभे केले आहेत. श्रीलेखा लिमये यांनी साकारलेल्या पाताळयंत्री कारस्थानी आनंदीबाई सरसच. 



हट्टी निश्चयी गोपिकाबाई मीरा भांडणकर सुरेख उभ्या करतात. सखारामबापू अन् गंगोबातात्या यांचा अभिनय नाट्यपूर्ण झाला आहे. नारायणराव, रामशास्त्री- नाना फडणवीस, रास्ते मामा अन् मैना, श्रीपती, सेवक यांनी आपापल्या भूमिका चोख वठवल्या आहेत. शिल्पा नागेशकर यांनी केलेली थेट त्या काळात घेऊन जाणारी, त्या काळाला साजेशी वेशभूषा अन् सुरजित च्यारी यांनी केलेले शनिवारवाड्याचा आभास निर्माण करणारे नेपथ्य नाटकाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. शर्व सरज्योतिषी यांची प्रकाशयोजना नाटकातील भावभावनांचे कंगोरे अजून ठळक करते. उत्तम पार्श्वसंगीत ही या नाटकाची एक जमेची बाजू.



अशा सर्व देखण्या बाजूंनी नटलेले हे नाटक म्हणजे गोव्यातील ऐतिहासिक रंगभूमीने घेतलेला एक ताजा श्वासच आहे असे म्हणावे लागेल. या नाटकाच्या निमित्ताने ऐतिहासिक रंगभूमीला प्रेक्षकवर्ग अजूनही दाद देतो आहे हे पुन्हा एकदा समजून आले! ती जादू अजूनही ओसरलेली नाही. कारण बऱ्याच काळापासून अंतरलेल्या, अन् नवे रूपडे लेऊन आलेल्या या रंगभूमीच्या स्वागतासाठी रसिक पायघड्या अंथरून सज्ज आहेत! 

- सिद्धी नितीन महाजन








 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SUQACV
Similar Posts
नाट्यसंजीवनी : भाग दुसरा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दुसरा भाग...
Hindu and Jain temples of Abhapur - Intricate Windows Intricate जाली windows at the Jain temple of Abhapur, in Polo Forests. Every single jaali is different from another. No pattern is repeated. Think of the creativity involved, the strategic design thinking that must have gone into this. The play of light and shade is so intriguing. Chiaroscuro they call
सुबोध भावे बनला प्रस्तुतकर्ता मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमांत वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही परिचित आहे. आता तो प्रस्तुतकर्ता म्हणून पुढे येत आहे. आटपाडी नाइट्स या चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्तुतकर्ता म्हणून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे
पेशवेकालीन इतिहासातील वाड्यांचे स्थापत्य - भाग ३ चहूबाजूंनी बंदिस्त असलेल्या वाड्याची रचना बाह्य आवार (शेतीविषयक कामे, जनावरांसाठी गोठे, घोड्यांसाठी पागा), कार्यालय व शेवटी खासगी निवास अशा तीन भागांत विभागलेली असे. ह्या रचनेवर वाड्यातील वायुविजन, स्वच्छता, स्वच्छताकक्ष, परिचलन अवलंबून असते. तत्कालीन वाड्याच्या रचनेत कुटुंब सुरक्षितता, पर्यावरण, अंतर्गत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language